• +91 - 7738 342 065
  • chaitanyajambhulpada@gmail.com

Sixth & Seventh Annual Day

'चैतन्य' चा सहावा आणि सातवा वर्धापनदिन एकत्रितपणे २० जानेवारी २०१९ ला साजरा करण्यात आला. मागच्या वर्षी 'चैतन्य' मध्ये दुरुस्ती आणि देखभालीची कामं चालू होती. त्यामुळे त्यावर्षी वर्धापनदिन साजरा करता आला नव्हता.
जानेवारी महिना असल्यामुळे वातावरणात अजूनही गारवा होता. हवा अजूनही आल्हाददायक होती. त्यामुळे 'चैतन्य' च्या निवासींचा उत्साह आणखी वाढला. सकाळपासूनच सगळीकडे हसणं-खिदळणं, गप्पा-गोष्टी चालू होतं आणि याच प्रसन्न वातावरणात निवासी आणि सेवक- सेविका सगळे मिळून कार्यक्रमाची तयारी करत होते. काही तयारी तर आदल्या रात्रीच पूर्ण करण्यात आली होती. मुख्य म्हणजे 'चैतन्य' च्या भोजन कक्ष आणि मनोरंजन कक्ष यांच्या मधल्या मोकळ्या जागेत एक रंगमंच तयार करण्यात आला होता आणि सगळीकडे फुलांच्या माळांची सजावट करण्यात आली होती. तसंच दारात सुंदर आणि रेखीव रांगोळी काढण्यात आली होती. २० तारखेला सकाळी दारातच एका मोठ्या फलकावर येथील निवासी श्रीमती नाडकर्णी यांच्या सुवाच्य अक्षरात दिवसभराच्या कार्यक्रमाची रूपरेषा लिहिण्यात आली होती. सकाळपासूनच सनईच्या रेकॉर्ड्स लावल्यामुळे आणि सगळ्यांनी अगदी आपले ठेवणीतले कपडे घातल्यामुळे वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाला एखाद्या सणाचं स्वरूप आलं होतं.
बरोबर १० वाजता कार्यक्रम सुरु झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि उपस्थित पाहुण्यांचे स्वागत 'चैतन्य' चे निवासी श्री. अनिल बाळ यांनी नेहमीच्याच सफाईने केलं. सर्वप्रथम 'चैतन्य' चे संस्थापक- विश्वस्त श्री. यशवंत देवस्थळी, विश्वस्त श्री. शिरीष घोगे आणि येथील ज्येष्ठ निवासी श्रीमती शीला भावे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झालं.
यानंतर 'चैतन्य' च्या सर्व सेविकांनी एक ईशस्तवन सादर केलं. हे गाणं 'चैतन्य' मध्ये काही काळापुरत्याच राहायला आलेल्या सौ. सुहासिनी जोशी यांनी सेविकांकडून तयार करून घेतलं होतं. यानंतर 'चैतन्य' च्या नव नियुक्त विश्वस्त डॉ. सौ. मुग्धा आपटे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि मागील वर्षांत झालेल्या 'चैतन्य' मधील प्रमुख उपक्रम आणि कार्यक्रमांचा मागोवा घेतला. सेविकांच्या वतीने 'चैतन्य' मध्ये बरीच वर्षे काम करणाऱ्या एक सेविका सौ. दीक्षा भोसले यांनी भाषण केले आणि सगळ्यांची मने जिंकली. निवासींच्या वतीने श्रीमती नाडकर्णी यांनी त्यांच्या 'चैतन्य' मध्ये राहण्याच्या अनुभवावर भाषण सादर केलं. तर श्रीमती चिपळूणकर यांनी त्यांचे अनुभव अतिशय समर्पक आणि मार्मिक अशा कवितेतून मांडले. तर आधी राहून गेलेले आणि ऋणानुबंध कायम असणारे श्री सहस्त्रबुद्धे यांनी 'चैतन्य' वर एक आगळ्या वेगळ्या प्रकारची गजाली सादर केली जिला सगळ्यांनीच उत्स्फूर्त दाद दिली.
सर्व मनोगतांनंतर ज्या कार्यक्रमाची सर्व प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते तो कार्यक्रम चालू झाला. तो कार्यक्रम म्हणजे 'चि. सौ. कां रंगभूमी' या नव्या कोऱ्या नाटकाच्या पहिल्या अंकाचे सादरीकरण ! मराठी रंगभूमीचा देदीप्यमान आणि गौरवशाली इतिहास एका अभिनव आणि रंजक प्रकारे गुंफून लोकांसमोर( आणि मुख्यतः नवीन पिढीसमोर) मांडणारं हे नाटक ! या नाटकाचे निर्माते आहेत 'चैतन्य' चे संस्थापक आणि विश्वस्त श्री. यशवंत देवस्थळी आणि नाट्यसंपदा कला मंच चे श्री अनंत वसंत पणशीकर ! नाटकाच्या लेखिका -दिग्दर्शिका आणि प्रमुख कलाकार असलेल्या संपदा जोगळेकर कुळकर्णी यांनी भाषेचं सौंदर्य अधोरेखित करणारं हे सुंदर नाटक लिहिलं आहे. त्याला तितकीच तोला मोलाची साथ सर्व कलाकारांकडून लाभलेली आहे. आणि नाटकाचा एक अतिशय देखणा प्रयोग सादर होतो. 'चैतन्य' च्या वर्धापनदिनी उपलब्ध जागेच्या मर्यादेमुळे 'चि . सौ. कां रंगभूमी' या नाटकाचा नेपथ्य-प्रकाशयोजना नसून देखील पहिला अंक दिमाखात सादर करण्यात आला. नाटकाच्या सुरुवातीला यातील कलाकार अमोल कुलकर्णी यांनी रंगभूमी आणि रसिकराज यांच्या लग्नसोहळ्याचे आगळ्या वेगळ्या आणि गमतीदार पध्द्तीने आमंत्रण उपस्थित प्रेक्षकांना दिले. मग रंगभूमी(नाटकाच्या लेखिका-दिग्दर्शिका संपदा जोगळेकर कुळकर्णी) आणि रसिकराज(राहुल मेहेंदळे) यांना नाटकाचे निर्माते( श्री. देवस्थळी आणि श्री. पणशीकर) प्रेक्षकांसमोर घेऊन आले. उपस्थित प्रेक्षकांच्या साक्षीने, फुले उधळत, मंगलाष्टकांच्या नादात हा विवाह सोहळा पार पडला.
'पंचतुंड नररुंडमालधर' ही 'संगीत शाकुंतल' या नाटकातील नांदी नाटकातील सर्व कलाकारांनी अमोल कुलकर्णी, नचिकेत लेले, केतकी चैतन्य, शमिका भिडे, अवधूत गांधी,संपदा जोगळेकर कुळकर्णी आणि राहुल मेहेंदळे ) सादर केली. पहिल्या अंकात नाट्यपदं आहेत. ती या कलाकारांनी सादर केली. उपस्थित प्रेक्षकांमध्ये बरेचसे ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे आणि या सगळ्यांनीच मराठी नाटकांचा तो गौरवशाली काळ प्रत्यक्ष अनुभवला असल्यामुळे या कलाकारांच्या बहारदार गायनामुळे सगळ्यानांच तो काळ पुन्हा अनुभवायला मिळाला. कित्येक प्रेक्षक ताल धरत होते, नाट्यगीते स्वतः म्हणत होते आणि उत्स्फूर्त दाद देत होते.
अवधूत गांधी 'सं स्वरसम्राज्ञी' नाटकातील 'टुमदार कुणाची छान' हे गीत त्यांच्या दमदार आवाजात सादर केलं. संगीत नाटकांतील पदांबरोबरच 'संगीत एकाच प्याला' या नाटकातील तळीरामाचा एक प्रवेश अमोल कुलकर्णी यांनी छान सादर केला( तसंच नंतर प्रेक्षकांच्या आग्रहाखातर 'मोरूची मावशी' नाटकातील सुप्रसिद्ध गाण्यावरील त्यांचा नाचही सगळ्यांना आवडला) ज्योत्स्ना भोळे यांची दोन पदे सादर झाली- यापैकी 'बोला अमृत बोला' (सं कुलवधू ) हे पद केतकी चैतन्य यांनी म्हटलं तर दुसरं 'मी पुन्हा वनांतरी फिरेन हरिणीवाणी' (सं- भूमिकन्या सीता) हे शमिका भिडे यांनी म्हटलं. दोन्ही अतिशय अवघड आणि बारीक बारीक कलाकुसरीची आणि हरकती-मुरक्यांची पदं ! पण केतकी चैतन्य आणि शमिका भिडे यांनी सहजतेने ती म्हटली...
सं शारदा या नाटकातील दोन वेगवेगळ्या मूड्स मधली पदं केतकी चैतन्य यांनी लागोपाठ सादर केली. ती पदं म्हणजे - मूर्तिमंत भीती उभी आणि म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयोमान ! या नंतर'चैतन्य' मधलं वातावरण पूर्णतः बदलून गेलं ते बालगंधर्व यांच्या वेशात अवतरलेल्या नचिकेत लेले यांच्यामुळे ! बालगंधर्व यांच्या त्या सुप्रसिद्ध लकबी आणि त्यांच्या रंगभूमीवर सहज वावर नचिकेत लेले यांनी हुबेहूब सादर केला. तसंच बालगंधर्वांची गाजलेली 'नाथ हा माझा मोही खला'(सं स्वयंवर), 'नरवर कृष्णा समान'(सं स्वयंवर) ही पदं उत्कृष्टपणे गाऊन उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. सरतेशेवटी भैरवी रागातील पद- 'तम निशेचा सरला' (ययाती आणि देवयानी) तसंच सौ वर्ष भावे यांनी स्वरबद्ध केलेला भैरवी रागातील तराणा सादर होऊन ही अविस्मरणीय मैफिल संपली.
या नाटकात तबल्याची साथ श्री. सुहास चितळे यांनी केली होती तर ऑर्गनची साथ श्री.चंद्रशेखर भांबर्डे यांची होती. प्रेक्षकांना भारावून टाकणाऱ्या या सादरीकरणानंतर निर्माते श्री. यशवंत देवस्थळी आणि श्री. अनंत वसंत पणशीकर यांनी सर्व कलाकारांची ओळख करून दिली. तसंच या नाटकाचा लिखाणापासूनचा प्रवास उलगडून दाखवत संपदा जोगळेकर कुळकर्णी आणि कलाकार राहुल मेहेंदळे यांनी प्रेक्षकांशी अनौपचारिक संवाद साधला. सर्व कलाकारांना 'चैतन्य' च्या विश्वस्तांच्या वतीने एक छोटीशी भेट देण्यात आली.
संस्थापक विश्वस्त श्री. यशवंत देवस्थळी यांच्या आभार प्रदर्शनाने वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमासाठी निवासींचे नातेवाईक, पुणे, मुंबई, ठाणे येथील 'चैतन्य' चे हितचिंतक, सन्माननीय पाहुणे, जांभूळपाडाचे सरपंच, जांभुळपाडा मधील अन्य वृद्धाश्रमांमधील पदाधिकारी, निवासी असा मोठा प्रेक्षकवर्ग उपस्थित होता.