• +91 - 7738 342 065
  • chaitanyajambhulpada@gmail.com

Fifth Annual Day

ईशस्तवन सेविकांनी सादर केलं
सूत्र संचालन - अनिल बाळ
अच्युत गोडबोले ह्यांचे "माझा लेखन प्रवास" ह्या विषयावर भाषण
सेविका (मनाली दळवी ) मनोगत
निवासी (सहस्त्रबुद्धे) मनोगत
विश्वस्त (शिरीष घोगे ) मनोगत
आठवणीतली गाणी - हिंदी मराठी गीतांचा वाद्यवृंद
प्रेक्षक कार्यक्रमाचा आनंद घेताना
श्री देवस्थळींना financial express चा "life time achievement award" मिळाल्या बद्दल श्री व सौं चा निवासींतर्फे सत्कार
उषाताई टोळे (व्यवस्थापिका) ह्यांचे आभार प्रदर्शन
संस्थेचे आधार स्तंभ - सेवक सेविका
 
चैतन्य ज्येष्ठ नागरिक सहनिवास'चा पाचवा वर्धापनदिन गुढी पाडव्याच्या सुमुहूर्तावर म्हणजेच २८ मार्च २०१७ ला साजरा करण्यात आला. प्रवेशद्वारात नक्षीदार रांगोळी काढलेली होती. दारातच एक छोटीशी गुढी ठेवण्यात आलेली होती. 'चैतन्य'च्या निवासी श्रीमती नाडकर्णी यांनी सुवाच्य अक्षरांत कार्यक्रमाची रूपरेषा एका मोठ्या फलकावर लिहिलेली होती.
सर्वप्रथम 'चैतन्य'चे संस्थापक विश्वस्त श्री. यशवंत देवस्थळी यांच्या हस्ते प्रवेशद्वारात उभ्या करण्यात आलेल्या एका उंच गुढीची पूजा करण्यात आली. मुख्य कार्यक्रम ठीक १० वाजता सुरु झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक 'चैतन्य' चे निवासी श्री. अनिल बाळ यांनी केले. सर्वप्रथम कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. अच्युत गोडबोले, 'चैतन्य' चे संस्थापक विश्वस्त श्री. यशवंत देवस्थळी, तसेच विश्वस्त श्री. शैलेश राजाध्यक्ष आणि श्री. शिरीष घोगे आणि 'चैतन्य' च्या ज्येष्ठ निवासी श्रीमती चिपळूणकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यानंतर 'चैतन्य'च्या सेविकांनी ईशस्तवन सादर केले. यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री अच्युत गोडबोले यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीची, त्यांच्या मुशाफिरीची आणि त्यांच्या पुस्तकांची ओळख 'चैतन्य'च्या संस्थापक संचालिका सौ. लीना देवस्थळी यांनी करून दिली.
पुढे श्री. अच्युत गोडबोले यांचे 'माझा लेखनप्रवास' याविषयावर संस्मरणीय भाषण झाले. भाषणातून त्यांनी त्यांच्यावर लहानपणापासून झालेले साहित्य आणि संगीताचे संस्कार, त्यांना सतत वाटणारे कुतूहल आणि त्यातून कुठल्याही विषयाच्या गाभ्यापर्यंत पोचण्याचा त्यांचा स्वभाव हे सर्व उलगडून सांगितले. त्यांची इंग्रजीत ४ व मराठीत २९ अशी तब्बल ३३ पुस्तकं आजवर प्रकाशित झालेली आहेत. आत्मचरित्रात्मक- 'मुसाफिर', संगीतावर आधारित 'नादवेध', अर्थशास्त्रावर आधारित 'अर्थात', मानसशास्त्रावर आधारित 'मनात' आणि 'मनकल्लोळ', शास्त्रज्ञांवर 'किमयागार' व 'जीनियस' ही मालिका- ही यापैकी काही ठळक पुस्तके होत! या पुस्तकांमधल्या वैज्ञानिक, गणिती, चित्रकार इत्यादींचे उद्बोधक, रंजक आणि ज्ञानप्रवर्तक असे किस्सेही त्यांनी श्रोत्यांसमोर सादर केले आणि श्रोत्यांना अक्षरश: खिळवून ठेवले.
भाषणानंतर श्री. गोडबोले यांच्या हस्ते 'चैतन्य'मध्ये घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांच्या विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. विजेत्यांमध्ये श्री. फडके, श्री. सहस्र्बुद्धे, श्री. बाळ, श्री. दातार तसेच श्रीमती चिपळूणकर, श्रीमती नाडकर्णी आणि व्यवस्थापिका सौ टोळे, तसेच सौ. ईशा आणि सुभाष सोगम, श्री. धावडे या सेवकांचा समावेश होता.
'चैतन्य' च्या वर्धापनदिनानिमित्त दरवर्षी कोणी ना कोणी निवासी व सेवकवर्गापैकी कोणीतरी आपले मनोगत व्यक्त करते. यावर्षी निवासींच्या वतीने श्री. सहस्र्बुद्धे यांनी त्यांचे 'चैतन्य'मध्ये राहण्याचे समाधानकारक अनुभव नेमकेपणाने मांडले. तर सेवकवर्गाच्या वतीने सौ. मनाली दळवी बोलल्या. 'चैतन्य'चे विश्वस्त श्री. शिरीष घोगे यांनी गेल्या वर्षभरातील 'चैतन्य' मधल्या प्रमुख घडामोडी आणि उपक्रमांचा आढावा तसेच विश्वस्तांची भूमिका याविषयी श्रोत्यांशी संवाद साधला.
नुकतंच 'चैतन्य'चे संस्थापक विश्वस्त श्री. यशवंत देवस्थळी यांना 'The Financial Express' या वृत्तपत्राकडून 'Lifetime Achievement Award' देऊन गौरवण्यात आलं. म्हणूनच सर्व निवासींच्या वतीने श्री. थोरात यांनी श्री. देवस्थळींचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
यानंतर जुन्या हिंदी- मराठी गाण्यांचा 'आठवणीतली गाणी' हा कार्यक्रम झाला. यात गायक होते श्री. संजय टिळक आणि सौ. हेमांगी देवरुखकर. तबल्यावर साथ करणारे होते श्री. प्रकाश देवरुखकर, सिंथेसायझर वादक होते डॉ. प्रमोद ढोरे आणि साईड ऱ्हिदम वर होते श्री. रवींद्र वेर्णेकर. कार्यक्रमाच्या निवेदिका होत्या सौ. दीपाली केळकर. 'फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार', 'या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे' 'नवीन आज चंद्रमा' 'ये रातें ये मौसम नदी का किनारा' 'पुकारत चला हूं मैं' 'जिया लागे ना' 'या सुखांनो या' या सारखी अवीट गोडीची १२ गाणी सादर झाली. गाण्याच्या कार्यक्रमानंतर सर्व कलाकारांचा 'चैतन्य' चे हितचिंतक श्री. वीरेंद्र तुळजापूरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सरतेशेवटी 'चैतन्य'च्या व्यवस्थापिका सौ. उषाताई टोळे यांचे आभारप्रदर्शनाचे भाषण झाले. ते भाषण औपचारिक नव्हते. त्यात भावनिक ओलावा होता. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व सेवकवर्गाने घेतलेल्या मेहनतीचे त्यांनी मनापासून कौतुक केले. त्या सेवकवर्गाला सर्वांसमोर बोलावून सौ टोळे यांनी त्यांना 'चैतन्य'चे आधारस्तंभ म्हणून गौरवलं.
कार्यक्रमासाठी निवासी, त्यांचे आप्तेष्ट, चैतन्य'चे हितचिंतक, श्री. व सौ. देवस्थळींचा मित्र परिवार, नातेवाईक तसेच जांभूळपाड्यामधील 'आनंदधाम' व 'स्नेहबंधन ' या इतर वृध्दाश्रमातील पदाधिकारी व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. उपस्थित सर्व लोकांसाठी माजी निवासी श्री. थोरात यांनी जेवणात पुरणपोळीची व्यवस्था केलेली होती. जिलेबी व पुरणपोळी, बटाटे वड्यांचा चा आस्वाद घेत कार्यक्रमाची सांगता झाली.